पीएफवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता!

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला पीएफचे महत्त्व माहिती असते. भविष्यातील आर्थिक तरतूदींसाठी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हा फंड सुरक्षित मानला जातो. या फंडमध्ये कर्मचाऱ्यांचे आणि कंपनीचे पैसे जमा होतात. त्याचसोबत त्यावर चांगले व्याजही मिळते. त्यामुळे भविष्यातील आर्थिक तरतूदीच्या दृष्टीने हा फंड महत्त्वाचा असतो. मात्र, आता या सुरक्षित फंडवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. ‘लाइव्ह मिंट’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या पीएफ म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्के दराने व्याज मिळते. त्यात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. पीएफच्या व्याजदरात 15 ते 25 अंकांची कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपात झाल्यावर त्याचा परिणाम 8 कोटींपेक्षा जास्त पीएफ खातेधारकांवर होणार आहे. त्यांना आधीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे. श्रम मंत्रालयाने 2019 या आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के या दराने व्याज देण्याची घोषणा केली होती. याआधी पीएफवर 8.55 टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र, हा फंडची कामगिरी समाधानकारक नसल्याने सध्याचे व्याजदर कमी करण्याचा सरकारचा विचार आहे.

पीएफवर अधिक व्याजदर देण्यास अर्थमंत्रालयही तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या दराने व्याज देणे बँकांना शक्य होणार नाही. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या बचत खातेधारकांना बँकेकडून 4 ते 6 टक्के दराने व्याज देण्यात येते. तर मुदत ठेवींवर 5 ते 8 टक्के दराने व्याज देण्यात येते. बँकांनी बचत खाते आणि मुदतठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. तसेच आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. तसेच पीएफच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या