
मेरिकेने खुल्या केलेल्या एपस्टीन फाइल्सने जगाला धक्के दिले आहेत. जगातील सर्वात मोठय़ा सेक्स स्कँडलशी संबंधित तब्बल 30 लाख पानांच्या या फाइल्समधून अनेक गुपिते चव्हाटय़ावर आली असून पाच देशांतील नेत्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
अल्पवयीन मुलींची तस्करी व लैंगिक शोषणाच्या हजारो प्रकरणांतील गुन्हेगार एपस्टीनचा अमेरिकेतील तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता. अमेरिकेसह जगभरातील श्रीमंतांची व राजकीय नेत्यांची गुपिते त्यांच्याकडे असल्यामुळेच त्याची हत्या झाल्याचा आरोप झाला. तसेच, त्याचे सगळे पत्रव्यवहार, ई-मेल्स, फोटो, व्हिडीओ खुले करण्याची मागणी होऊ लागली. त्या दबावापुढे झुकून ट्रम्प सरकारने त्याच्या फाइल्स खुल्या करण्याचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने ही कागदपत्रे समोर येत आहेत. या कागदपत्रांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
ब्रिटनच्या सत्तेला हादरे
एपस्टीन फाइल्समुळे युरोपातील अनेक देशांत उलथापालथ सुरू आहे. सर्वाधिक हादरा ब्रिटनला बसला आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी, माजी राजदूत पीटर मँडेलसन आणि सरकारचे राजकीय सल्लागार ऍडम पेरी यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर, पंतप्रधान स्टार्मर यांनी मँडेलसन यांच्या नियुक्तीबद्दल माफी मागितली आहे.
नॉर्वेच्या जॉर्डनमधील राजदूत मोना जूल यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. एपस्टीनने आपल्या मृत्युपत्रात जूल यांची मुले व पतीच्या नावे 1 कोटी डॉलर्स ठेवल्याचे समोर आले आहे.
स्लोव्हाकियाचे माजी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाजॅक हेही पायउतार झाले आहेत.
स्वीडनच्या वरिष्ठ मुत्सद्दी जोआना रुबिनस्टीन यांनीही पद सोडले आहे.
अमेरिकेचे कामगार मंत्री ऍलेक्स एकोस्टा आणि एमआयटी लॅब प्रमुख जोइची इतो यांच्यावरही राजीनाम्याची नामुष्की ओढवली आहे.




























































