साखरेसह इथेनॉल उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शीतल धनवडे

राज्यात लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी अपेक्षेपेक्षा 31 लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यात गळीत हंगाम सरासरी 30 दिवसांनी कमी झाल्याने इथेनॉल पुरवठय़ाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. राज्यातील सहकारी आणि खासगी मिलर्सच्या नवीन अंदाजानुसार डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या वर्षभरात 132 कोटी लिटर उद्दिष्ट असलेला इथेनॉल पुरवठा 127 कोटी लिटर झाला आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनात पाच कोटी लिटर घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील यंदा 210 नोंदणीकृत सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे. या हंगामात 122 ते 123 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये चांगला पाऊस आणि वाढत्या उसाचे एकरी उत्पादन यामुळे महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने यंदा 138 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. सध्या सोलापूर जिह्यातील एकच साखर कारखाना सुरू आहे. 16 एप्रिलपर्यंत राज्यातील कारखान्यांनी 1 हजार 54.75 लाख टन उसाचे गाळप केले असून, 105.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याचवेळी अजून 55 कारखाने सुरू होते. तर, 1 हजार 223.42 लाख टन ऊसगाळप करून, 127.53 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा अपेक्षेपेक्षा सरासरी 31 लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले.

गेल्या आठवडय़ात अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच पेट्रोलियम सचिवांच्या अध्यक्षतेखाली साखर आणि इथेनॉलनिर्मितीसाठी आढावा बैठक झाली. यामध्ये 2022-23 वर्षाच्या शेवटच्या दोन तिमाहींसाठी इथेनॉल करार पूर्ण करण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आल्याचे समोर आले. महाराष्ट्रातील तुटवडा यंदाच्या इंधनासाठी 12 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टावर परिणाम करण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कारखान्यांकडून धान्यावर आधारित डिस्टिलरीतून इथेनॉलनिर्मिती होत असल्याने इथेनॉलनिर्मितीचे उदिष्ट पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

इथेनॉलची आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • देशाची इथेनॉल गरजः 1 हजार 37 कोटी लिटर
  • सध्याचे उत्पादनः 542 कोटी लिटर
  • महाराष्ट्राची गरजः 60 ते 65 कोटी लिटर
  • राज्याची उत्पादनक्षमताः 130 कोटी लिटर
  • परकीय चलनाची बचतः 30 हजार कोटी रुपये