इथिओपियाच्या टेरेफे हैमानोतने जिंकली पुणे मॅरेथॉन महिला गटात हिंदुस्थानची साक्षी जडयाल विजेती

भल्यापहाटेचे (तीन वाजता) आल्हाददायक वातावरण… देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह… परदेशी खेळाडूंचीही समाधानकारक संख्या… रहदारी नसल्याने धावपटूंसाठीचा सुटसुटीत मार्ग… अशा एकूणच प्रसन्न व सकारात्मक वातावरणात रंगलेल्या 39 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये (42 किलो मीटर) इथिओपियन धावपटू टेरेफे हैमानोत याने बाजी मारली, मात्र महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये गतवेळच्या अर्ध मॅरेथॉन विजेत्या हिंदुस्थानच्या साक्षी जडयाला हिने इथिओपियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान मोडून काढत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात हिंदुस्थानच्या सचिन यादवने, तर महिला गटातही हिंदुस्थानच्याच भारतीने विजेतेपदाला गवसणी घातली.

देशातील मॅरेथॉनची जननी म्हणून ओळखला जाणारा ‘पुणे मॅरेथॉनोत्सव’ हा डिसेंबरच्या पहिल्या रविवारी घेण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे रविवारी (दि. 7) पहाटे 3 वाजता ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ सणस मैदानजवळील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून झाला. सर्व गटातील सर्व स्पर्धक परतल्यानंतर सणस मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला.  मुख्य शर्यतीला सुरुवात होताच अपेक्षेप्रमाणे इथिओपियाच्या काही धावपटूंच्या जथ्याने पहिल्या झटक्यातच मुसंडी मारली. त्यात काही हिंदुस्थानी धावपटूही होते. शर्यत कल्पना-विश्व चौकापासून सारसबाग, वीर सावरकर पुतळा येथून सिंहगड रस्त्यावरून मार्गस्थ झाली. पहिल्या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये आठ-दहा धावपटूंमध्येच पाठशिवणीचा खेळ रंगला होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा जथाही फुटला. शेवटच्या टप्प्यात टेरेफे हैमानोतला त्याचाच देशसहकारी मिको डेरेजे व हिंदुस्थानच्या त्रिथा पुन यांनी तुल्यबळ लढत दिली, मात्र  टेरेफेने 2 तास 20 मिनिटे 8 सेकंद वेळेत शर्यत जिंकली, तर मिकोला एका सेकंदाच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानचा त्रिथा 2 तास 20 मिनिटे 17 सेकंद वेळेसह तिसऱया स्थानी राहिला. महिला गटाच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानच्या साक्षी जडयाल  विजेती ठरली.

पुणे मॅरेथॉनचे निकाल

पुरुष पूर्ण मॅरेथॉन

टेरेफे हैमानोत (इथिओपिया) – 2ः20ः08, मिको अलेमू (इथिओपिया) , – 2ः20ः09

त्रिथा पुन (हिंदुस्थान) – 2ः20ः17

महिला पूर्ण मॅरेथॉन  

साक्षी जडयाल (हिंदुस्थान) – 2ः39ः37, इडओ टिलू (इथिओपिया), – 2ः40ः56

वारे बोंटू (इथिओपिया) – 2ः50ः46

पुरुष अर्ध मॅरेथॉन

सचिन यादव (हिंदुस्थान) – 1ः03ः43 , राज त्रिवारी (हिंदुस्थान) – 1ः03ः44, मुकेश कुमार (हिंदुस्थान),  1ः04ः03

महिला अर्ध मॅरेथॉन

भारती (हिंदुस्थान) – 1ः13ः59

रविना गायकवाड, (हिंदुस्थान) – 1ः15ः58

त्सेहाय देसलगन (हिंदुस्थान) – 1ः18ः19