इराणसाठी मुस्लिम देश एकवटले! युरोपियन देश अमेरिकेच्या बाजूने

इराण-इस्रायल युद्धात उडी घेऊन अमेरिकेने इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या कृत्याचा जगातील अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. चीन व रशिया या बलाढय़ राष्ट्रांनी अमेरिकेचा निषेध केला आहे. पाकिस्तानसह सर्व मुस्लिम देश अमेरिकेच्या विरोधात एकवटले असून येमेनने इराणच्या बाजूने थेट युद्धात उडी घेतली आहे. दुसरीकडे युरोपियन युनियनसह इतर पाश्चात्य राष्ट्रांनी अमेरिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे होण्याची भीती व्यक्त होत आहे.  

संयुक्त राष्ट्रांना चिंता; आज आपत्कालीन बैठक

हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर भाष्य केले आहे. जागतिक शांततेसाठी हे धोकादायक आहे. सैनिकी कारवाई हा तोडगा नाही. कुठल्याही वादावर केवळ चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, असे गुटेरस यांनी म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अणु देखरेख संस्थेने उद्या यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

इंग्लंड अमेरिकेच्या बाजूने

इराणविरुद्धच्या वादात इंग्लंडने अमेरिकेची बाजू घेतली आहे. अमेरिकेने जे काही केले, ते योग्यच आहे. इराणला चर्चा करण्यास भाग पाडण्याची गरज आहे, असे इंग्लंडने म्हटले आहे.

इराणचा अणुकार्यक्रम जगासाठी धोका ऑस्ट्रेलिया

इराणने हाती घेतलेले अणुऊर्जा प्रकल्प आणि क्षेपणास्त्र निर्मिती हा जागतिक शांततेसाठी धोका आहे. मात्र या सगळ्यावर चर्चा आणि राजनैतिक डावपेच वापरून मार्ग काढला जायला हवा, असे
ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.  

युनोच्या सुरक्षा परिषदेने भूमिका स्पष्ट करावी रशिया

रशियाने अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला असून या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने यावर भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री लवकरच रशियाला जाणार असून व्लादिमिर पुतीन यांची भेट घेणार आहेत.  

हे घातक वळण चीन

अमेरिकेचा इराणमधील हल्ला म्हणजे वादाला लागलेले धोकादायक वळण आहे. मध्य पूर्वेत जेव्हा जेव्हा एखाद्या देशाने लष्करी हस्तक्षेप केला, तेव्हा तेव्हा त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. त्यातून दीर्घकालीन संघर्ष आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली आहे, असे चीनने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन पाकिस्तान

अमेरिकेचा हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. इराणच्या विरोधातील अमेरिकेची आक्रमकता अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीमुळे आम्ही चिंतित आहोत, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

अमेरिकेचा हल्ला इस्रायलच्या सांगण्यावरून व्हेनेझुएला

अमेरिकेने इराणमध्ये केलेला हल्ला हा इस्रायलच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. हे सैनिकी आक्रमण तत्काळ थांबवायला हवे, असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे.

जगाला संकटाकडे नेणारा हल्ला क्युबा

क्युबाने अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेची कृती हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून संपूर्ण जगाला संकटाकडे नेणारा हा हल्ला आहे, असे क्युबाचे राष्ट्रपती केनेल यांनी म्हटले आहे.

जर्मनी, मेक्सिको, न्यूझीलंडचे चर्चेचे आवाहन

मेक्सिको व न्यूझीलंडने दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. हा वाद केवळ चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, असे या दोन्ही देशांनी म्हटले आहे.