भूमिपूजनाचा नारळ फुटला तरी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे

ठाणे आणि बोरिवलीला जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या भुयारी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. मिंधे सरकारने गाजावाजा करत 13 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडला. मात्र प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भूसंपादन, अतिक्रमण हटवणे, वृक्षप्राधिकरणाच्या परवानग्याच घेतल्या नाहीत. या प्रलंबित परवानग्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे बनले आहेत.

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग असणार आहे. एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येणाऱ्या या मार्गासाठी 16 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केवळ शाब्बासकीची थाप मिळवण्यासाठी मिंधे सरकारने घाईगडबडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. मात्र या भुयारी प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोणत्याच परवानग्या मिळवल्या नाहीत. अखेर या बोगद्याच्या निर्मितीसाठी काटे बनून उभ्या राहिलेल्या या अडचणी दूर करण्यासाठी एमएमआरडीए आणि बांधकाम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्तांनी बैठकीत उपस्थित असलेले अधिकाऱ्यांना सूचना देत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठकीदरम्यान महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष बांधकाम स्थळाला भेट देऊन पाहणी करून परवानगीबद्दलचे विषय मार्गी लावतील, असे आश्वासन यावेळी संबंधित विभागाला दिले. त्यात जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळे प्रवेशद्वार आणि विविध परवानग्या सोडवल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचनादेखील यावेळी आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या.