
सामना प्रतिनिधी । बीड
बीड शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, भुयारी गटार व हरित क्षेत्र विकास (उद्याने) या योजना मंजूर आहेत. या तिन्ही योजना वेगवेगळ्या नसून त्या अमृत योजनेचाच भाग आहेत. सदरील अमृत योजनेचे उद्घाटन बीड शहरातील वेगवेगळ्या भागात किमान 10 वेळेस तरी करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा या योजना वेगवेगळ्या असल्याचे भासवून भुयारी गटार योजनेचे पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा घाट सत्ताधारी घालत आहेत व त्यास पालिका प्रशासनाची मूकसंमती आहे. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी सदरील 154 कोटी 94 लक्ष 15 हजार 347 रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश सदरील काम करणारी एजन्सी मे. इंद्रायणी कन्स्ट्रक्शन-केआयपीएल (जे.व्ही.) यांना दिलेले आहेत.
भुयारी गटार योजनेचे कार्यारंभ आदेश देऊन चार महिने झाले तरीही अद्याप भुयारी गटार योजनेचे काम सुरू झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सदरील काम तात्काळ चालू करण्याकरिता संबंधित एजन्सी मे.इंद्रायणी कन्स्ट्रक्शन-केआयपीएल (जे.व्ही.) कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून आग्रही आहे. तसे संबंधित ठेकेदाराने दिनांक 22 सप्टेंबर 2018 व दिनांक 13 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता भामरे यांच्यामार्फत मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रांवरून दिसून येते. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होऊन सदरील योजना कार्यान्वित झाल्यास अस्वच्छतेमुळे शहरात पसरणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण बसेल याचे जराही भान संबंधितांना राहिलेले नाही, साथ रोगांमुळे मृत्युला बळी पडलेल्या नागरिकांची सर्वस्वी जबाबदारी पालिका शासन व प्रशासनाची आहे, त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत असेही अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
बीड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या योजनेत विनाकारण उद्घाटनाचा घाट घालून जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून सदरील योजनेचे काम तात्काळ चालू करण्यात यावे व चिरीमिरीसाठी गुत्तेदार वेठीस धरण्याचा भ्रष्टाचारी डाव हणून पाडावा व पुढील पंधरा दिवसात भुयारी गटार योजनेचे काम चालू न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात येईल असा इशाराही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, बिभीषण लांडगे, रणजीत बनसोडे आदींनी दिलेला आहे.

































































