
टक्कल पडलं तरी लोक अक्कल शिकवतात, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली. राजगुरू नगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे व्यासपीठावर गेले आणि अजित पवार यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले, होय होय बाबा होय. आता हा मला शिकवायला चाललाय, आता असं बोला, आता तसं बोला. माझं पार टक्कल पडलंय ना. तरी लोक मला शिकवतायत. आता काय करू या बाबाला. बाबा लोकं अशीच असतात, असं ते मिश्किलपणे म्हणाले.
मी कामाचा माणूस आहे. माझी प्रशासनावर पकड आहे. पण काही लोक विनाकारण माझ्यावर आरोप करतात. मी काम करताना कुणाकडून पैसे घेतल्याचे किंवा मला चिरीमिरी द्यावी लागली हे दाखवून द्या. याउलट प्रशासन मला टरकून राहते. त्यांना भीती असते की याला समजलं तर काही खरं नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे, 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले गेले. मात्र मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही, असे ते म्हणाले.




























































