इव्हेंट कंपन्यांकडून लग्नाचे ‘कोरोना पॅकेज’, सुरक्षिततेची पुरेपूर खबरदारी

567

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कोरोनावाले देखते ही रहे जाएंगे’ अशी साद घालत कोरोनाच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी लग्नाचे ‘कोरोना पॅकेज’ बाजारात आणले आहे. ‘शादी वही… सोच नई ’ असे सांगून फक्त 30 ते 35 लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडण्यासाठी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतची पॅकेज आयोजकांकडून पुढे केली जात आहेत.

हॉल किंवा मंगल कार्यालयात नव्हे, तर आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंग आणि संपूर्ण खबरदारी घेऊन विवाह सोहळा कसा पार पाडून देणार, याचे हे पॅकेज आहे. लॉकडाऊन आणि शासनाच्या नियमावलीमध्ये लग्न सोहळा पार पाडून देण्याची कल्पना यानिमित्ताने पुढे आली आहे. उपस्थित व्यक्तींची मर्यादा, तसेच प्रत्येकाच्या लग्नखर्चाच्या बजेटनुसार आयोजकांकडून पॅकेज देऊ केले जात आहे.

सॅनटायझर, थर्मल क्रीनिंग, टेण्ट वजा मंडपात विवाह सोहळा करण्याची कल्पना इव्हेंटवाल्यांनी पुढे केली आहे. संपूर्ण मंडपाचे निर्जंतुकीकरण करून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची बैठकव्यवस्था, मास्क, मेकअपसाठी व्यक्ती, ब्राह्मण, जेवण, लग्नाचे हार, अक्षता, फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग यांसह आवश्यक गोष्टी या पॅकेजमधून पुरविण्याची हमी दिली जात आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटात लग्न तर झालेच पाहिजे. त्यासाठी नव्या कल्पना आणि क्लृप्त्यादेखील पुढे आल्या आहेत. आलिशान आणि खर्चिक विवाह सोहळ्याला कोरोनामुळे लगाम बसला असला, तरी विवाह सोहळे होत आहेत. फक्त लग्नामधील खर्चाचे ‘महत्त्व’ सगळ्यांना कळले आहे. कमी खर्चामध्ये होणारे सामुदायिक विवाह सोहळेदेखील बंद आहेत. अशा वेळी अशा छोटय़ा व कमी खर्चामध्ये विवाह सोहळे पार पाडून देण्याची कल्पना छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांनी शोधून काढली आहे.

छोटेखानी सोहळा
गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विवाह जुळून येण्याचे काम खूपच कमी झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात मुहूर्त असले, तरी बुकिंग नाही. जी लग्ने यापूर्वीच जुळली आहेत, ती छोटय़ा समारंभांमध्ये होत आहेत. त्यामुळे लॉन्स, मोठय़ा मंगल कार्यालयांसह हॉलमधील सर्व यंत्रणा बंद ठेवावी लागत असल्याचे लॉन्स आणि मंगल कार्यालयचालकांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या संकटात व्यवसायाची संधी
यंदाच्या लग्नसराईत मोठे हॉल, लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल बुक करून विवाह सोहळे करणे अशक्य झाले. विवाह सोहळ्याशी संबंधित व्यावसायिकांना त्याचा सर्वांत मोठा फटका बसला. वाजंत्री, मंडप, फोटोग्राफर, केटरिंग, ब्युटीपार्लर, घोडेवाले, फेटेवाले या सर्व घटकांचा यंदाचा हंगाम बुडाला, तरीदेखील काही छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांनी छोटय़ा पॅकेजच्या स्वरूपात कोरोनाच्या संकटामध्ये व्यवसायाची संधी शोधली आहे.

‘मंगल कार्यालय आणि हॉल बंद असल्यामुळे, तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे मर्यादित लोकांमध्येच लग्न समारंभ पार पाडावे लागतात. लग्नासाठी आवश्यक असणाऱया गोष्टींसाठी ऐनवेळी अनेक ठिकाणी फिरावे लागते. त्याऐवजी एकत्रित सुविधा देणारी व्यवस्था त्यांना हवी असते. म्हणून छोटय़ा लग्नाची स्वस्तातील पॅकेज व्यावसायिकांकडून दिली जात आहेत.’

अशोक माशेरे, मंगल कार्यालय व्यावसायिक

‘शासनाच्या नियमांप्रमाणे छोटा आणि मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होणार असला, तरी जेवणाची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी छोटय़ा स्वरूपात ऑर्डरप्रमाणे जेवण पुरविले जाते. लग्नाचे छोटे पॅकेज घेणाऱया व्यक्तींकडून आम्हाला ऑर्डर्स काही प्रमाणात मिळत आहेत.

विलास शेडगे, केटरिंग व्यावसायिक

आपली प्रतिक्रिया द्या