आईचे आडनाव वापरण्याचा प्रत्येक मुलाला हक्क, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडील आपल्या मुलीसाठी कुठल्याही अटी लादू शकत नाही. प्रत्येक मुलाला स्वतःच्या नावापुढे आईचे आडनाव वापरण्याचा हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. मुलीने माझे नाव आडनाव म्हणून वापरावे, अशी अपेक्षा याचिकाकर्त्या पित्याने व्यक्त केली होती. त्यावर पित्याला मुलीवर अशा कुठल्याही अटी लादण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने बजावले.

दिल्लीतील एका अल्पवयीन मुलीच्या पित्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी विविध महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. मुलीच्या कागदपत्रांमध्ये माझे नाव मुलीचे आडनाव म्हणून गृहीत धरण्यात यावे, यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती पित्याने केली होती. तथापि, असे निर्देश देण्यास न्यायमूर्ती पल्ली यांनी स्पष्ट नकार दिला. सुनावणीवेळी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, मुलीचे आडनाव याचिकाकर्त्याच्या विभक्त पत्नीने बदलले होते. मुलीच्या नावातील बदलामुळे विमा कंपनीकडून विमा दाव्यांचा लाभ घेणे मुश्कील बनेल. कारण मुलीची विमा पॉलिसी तिच्या वडिलांच्या आडनावाचा वापर करून घेतली होती.