नोटबंदीचीला चार वर्षे पूर्ण; हा विश्वासघात दिवस, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोटाबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशातील जनता मोठय़ा आर्थिक संकटात सापडली. अनेक उद्योगधंदे बुडाले, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली, लघु उद्योजक व व्यापारी वर्ग देशोधडीला लागले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, स्वतःचेच पैसे काढताना सुमारे 150 लोक बँकांच्या रांगेत मरण पावले, आज नोटांबंदीला चार वर्षे पूर्ण झाली तरीही या सर्व संकटांतून संपूर्ण जनता अजूनही सावरलेली नाही आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेचा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे म्हणून आजचा हा 8 नोव्हेंबर दिवस काँग्रेसतर्फे ‘विश्वासघात दिवस’ म्हणून घोषित केलेला आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना म्हणाले होते, खूप मोठय़ा प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल, दहशतवादी कारवाया बंद होतील, आतंकवाद संपेल, सर्व नकली चलन बाहेर येईल परंतु असे आतापर्यंत काहीही झालेले नाही. या उलट आपला देश मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी, असे एकनाथ गायकवाड म्हणाले.