
सामना ऑनलाईन । कोलकाता
कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी 4 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तिथे रविशंकर प्रसाद, कैलाश विजयवर्गीय आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करणारे मुकुल रॉयही होते. भारती घोष यांच्यावर अवैध संपत्ती बाळगल्याप्रकरणी 2018मध्ये कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच भारती यांच्या भाजपप्रवेशाने खळबळ माजली आहे.
भारती यांच्यावर सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2018मध्ये चंदन मांझी नावाच्या एका व्यक्तिने भारती यांच्यावर वसुली आणि कट रचण्याचे आरोप केले होते. त्यानंतर भारती यांची सीबीआय चौकशी झाली होती. त्यांच्या निरनिराळ्या घरांवर पडलेल्या छाप्यात तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल सापडला होता.
भारती घोष या आयपीएस अधिकारी असून त्यांच्याकडे हार्वर्ड विद्यापीठाची मॅनेजमेंटची पदवी आहे. बोस्निया आणि कोसोवो येथील युद्धप्रभावित प्रदेशात काम करण्याचा अनुभव भारती यांना आहे. त्यानंतर त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगाल येथे झाली. त्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त भागात काम केलं. तिथे यशस्वी कामगिरी केल्यानंतर घोष या ममता यांच्या जवळच्या बनल्या. त्यानंतर भारती घोष यांच्याबाबत ममताच्या पोलीस असल्याचं बोललं जाऊ लागलं. 2014च्या लोकसभा आणि 2016च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भारती यांच्या वर्तणुकीवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांना फूस लावणे, त्यांच्यावर दबाव आणण्याचे आरोप झाले. त्याखेरीज भारती यांनी पदाचा गैरवापर करून निवडणुकीत तृणमूलला फायदा करून दिल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, भारती यांनी कोणालाही जुमानले नाही.
ममता यांच्या गोटातील मुकुल रॉय यांच्याशीही भारती यांचे चांगले संबंध निर्माण झाले. त्यानंतर मात्र, हळूहळू ममता यांच्याशी भारती यांचे संबंध बिघडू लागले. मुकुल रॉय यांचं नाव शारदा चीटफंड घोटाळ्यात आलं. त्यांची सीबीआय चौकशी झाली. त्यानंतर मुकुल रॉय यांनी तृणमूल सोडलं आणि भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर सबांग येथील एका पोटनिवडणुकीनंतर घोष या भाजपमध्ये गेलेल्या रॉय यांची मदत करत असल्याचं ममता यांना समजलं. मग मात्र, घोष यांच्यापाठी सीआयडीचा ससेमिरा सुरू झाला. फेब्रुवारी 2018मध्ये घोष यांच्या घरातून अडीच कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. या प्रकरणात भारती यांनी राजीनामाही दिला. आता भाजपमध्ये दाखल झालेल्या भारती यांनी ममता यांची रहस्ये उघड करण्याची धमकी दिली आहे.























































