अघोरी पूजा करणाऱ्या मंत्र्यामुळे महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा धोक्यात, माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी सरकारला सुनावलं

“महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा आता राहिलेली नाही. जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन अनेक वर्षे झाली, तरीही राज्यातील एक मंत्री अघोरी पूजा करताना दिसतात,” असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी महायुती सरकारला सुनावलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेमंत गोखले यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा दाखला देताना सांगितले, “पूर्वी आगरकरांच्या जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढण्यात आली होती. र. धों. कर्वे यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर खटले चालले. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. महाराष्ट्राची हीच प्रवृत्ती आहे.”

गोखले पुढे म्हणाले की, “सध्या अल्पसंख्याकांवर अन्याय आणि धर्मद्वेषातून हत्या होत आहेत. जामनेर येथे एका तरुणाचा धर्मद्वेषातून खून झाला. हे सर्व प्रकार राज्यघटनेने अपेक्षित वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात आहेत.” ते म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन हे शासनाचे कर्तव्यच आहे. नागरिकांनी अंधश्रद्धेचा त्याग केला नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताच येणार नाही.”