जळगावमध्ये माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाची वैमनस्यातून हत्या

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश ( वय 28, रा. शिवाजीनगर) याची अज्ञात तरुणांनी हत्या केल्याची घटना शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ बुधवारी रात्री घडली. राकेश सपकाळे व त्याच्या लहान भावाचे काही दिवसांपूर्वी शनिपेठेतील तरुणांशी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून काही तरुणांनी राकेशची हत्या केली आहे.

मोठा भाऊ राजू उर्फ बाबू याचा गुरुवारी वाढदिवस असल्याने राकेशने वाढदिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. वाढदिवसाच्या होर्डिंगसह इतर वस्तू घेऊन राकेश भाऊ सोनू आणि सहकाऱ्यासह घरी परतत होता. राकेश स्मशानभूमी परिसरात आला असता दोन तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरूवातीला राकेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका धावत्या ट्रकसमोर ढकलेले. या ट्रकचा फटका राकेशच्या डोक्याला बसला. त्यामुळे तो जमीनीवर कोसळला. तो कोसळल्यानंतरही तरुणांनी चाकूने वार करत राकेशची हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या राकेश काही वेळातच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच माजी महापौर अशोक सपकाळेंसह कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले आहेत. तर मारेकरी फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

घटनास्थळावर राकेशची मोपेड आणि आणखी एक दुचाकी पडून होती. मारेकऱ्यांनी स्वत:ची दुचाकी देखील घटनास्थळी सोडून पळ काढला . या दोन्ही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यात लाडू गँगचे नाव समोर आले आहे. त्यातील गणेश व आकाश उर्फ भुन्या यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा हल्ला केल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या