46 हजार कोटी रुपयांच्या समृद्धी मार्गाच्या कारभाराची चौकशी करा, अनिल गोटे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत नेमका किती पारदर्शक कारभार केला हे जाणून घेण्याचा जनतेचा हक्क आहे. त्यासाठी 46 हजार कोटी रुपयांच्या समृद्धी मार्गाच्या कारभाराची सरकारने चौकशी करावी. तसेच यामध्ये प्रकल्पाचे माजी प्रमुख राधेश्याम मोपलवार यांची त्यामध्ये काय भूमिका आहे याचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

समृद्धी मार्गाच्या कामात राधेश्याम मोपलवार यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्या प्रत्यक्ष पुराव्यांसह पंतप्रधान कार्यालय आणि राज्य सरकारकडे आपण तक्रार केली होती. त्यानुसार केंद्राने मोपलवारांच्या  भ्रष्ट कारभाराबाबत सात वेळा तत्कालीन मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता, मात्र सचिवांनी कोणाच्या पाठिंब्यामुळे केंद्राला अहवाल देणे टाळले हे जनतेसमोर यायला हवे, असे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेकडून समृद्धी मार्गासाठी आठ हजार कोटींचे कर्ज घेताना राज्य सरकारने मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे गहाण ठेवला आहे. तसेच एलआयसीचे चेअरमन व्ही. के. शर्मा यांनीही प्रकल्प व्हायबल नसल्याने नाद सोडावा असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते तरीही फडणवीसांनी ऐकले नसल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कर्जदाराने कर्ज न फेडल्यास त्याची वसुली जामीनदाराकडून केली जाते, मात्र एसबीआयकडून 20 हजार कोटींचे कर्ज घेताना त्याला सरकारची हमी आहे. त्यामुळे कर्जदार म्हणजे एमएसआरडीसीने कर्ज न फेडल्यास त्यांच्या संपत्तीवर कोणतीही टाच न आणता सरकार 20 हजार कोटी रुपयांची परतफेड करेल असेही मान्य केल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.  

दोन सचिवांनी नकारात्मक शेरे मारलेले असतानाही फाइल मंत्रिमंडळापुढे

समृद्धी मार्गासाठी वीस हजार कोटी रुपये कर्ज घेताना तत्कालीन सचिव राजीव जलोटा आणि राजगोपाल देवरा यांनी तीन-चार वेळा कर्जाच्या फाइलवर नकारात्मक शेरा मारला होता. त्यामुळे त्यांच्या जागी मनोज सौनिक यांना आणून सदर फाइलवर सकारात्मक शेरा मारून मंत्रिमंडळापुढे आणली याचीही चौकशी करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे.  

अधिकार्‍यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयाचे नातेवाईक पीयूष आणि मुख्य अभियंता गायकवाड यांनी आधी समृद्धी मार्गातील जमिनी कवडीमोल दराने खरेदी करून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या जमिनी पुन्हा समृद्धी प्रकल्पाला हजारो कोटी रुपयांना विकल्या असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.