
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त हादरा बसला. माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा रामराम केला. निवेदिता माने यांनी त्यांचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सुपूर्द केला. माने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इचलकरंजी हातकणंगले येथे माने गटाचा प्रभाव असतानाही त्यांच्याकडे पक्षाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नाराज झालेल्या निवेदिता माने यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
धैर्यशील माने शिवबंधनात
निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून आणि हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. धैर्यशील माने यांच्या ‘मातोश्री’ भेटीवेळी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, संग्रामसिंह कुपेकर, संजय चौघुले, पी. एस. पाटील उपस्थित होते.


























































