
मुंबईचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय उर्फ पापा कारखानीस यांचे रविवारी (18 मे 2025) सकाळी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. आक्रमक फलंदाजी आणि चपळ यष्टीरक्षणासाठी ते ओळखले जात होते. सेंट्रल बँक आणि शिवाजी पार्क जिमखान्याकडून खेळताना त्यांना अनेक वेळा दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या जाण्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक असलेल्या कारखानीस यांनी रणजी विजेत्या मुंबईसाठी 7 सामने खेळले आहेत. 7 सामन्यांमध्ये त्यांनी 289 धावा केल्या असून यष्टीमागून आपली जादू दाखवत 19 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर मुंबईला सलग दहाव्यांदा रणजी जेतेपद पटकावून देण्यात त्यांनी कर्णधार मनोहर हार्डीकरांच्या सोबतीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मद्रासविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात (1967-68) त्यांनी पहिल्या डावात 53 आणि दुसऱ्या डावात 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच सेंट्रल बँक आणि शिवाजी पार्क जिमखान्याकडून खेळताना टाइम्स शिल्ड आणि कांगा लीग क्रिकेट स्पर्धांमध्येही त्यांनी दमदार खेळ केला.