
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याशीही चर्चा केली नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे. प्रणब मुखर्जी यांनीच आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. नोटाबंदीमुळे काहीही झाले नाही आणि काहीही होणार नाही, असे मी मोदींना सांगितले होते, असेही मुखर्जी यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे.
मोदींनी नोटबंदीसह आणखी काही घेतलेल्या निर्णयांवर मुखर्जींनी टीका केली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदींनी अचानक नोटबंदी जाहीर केली. त्यांनी आपल्याशी चर्चा केली नव्हती. निर्णय घेतल्यानंतर ते मला भेटायला राष्ट्रपती भवनात आले होते. नोटाबंदीमुळे होणारे फायदे सांगत होते. मात्र, तसे काहीही झाले नाही आणि होणार नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. तसेच नियोजन आयोग मोडीत काढण्याचा निर्णय घोडचूक आहे; पण वाद नको म्हणून मी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला नाही, असेही मुखर्जींनी नमूद केले आहे.
मोदींची कार्यशैली एकाधिकारशाहीची
नरेंद्र मोदी 2014च्या भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान झाले. पहिल्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली एकाधिकारशाही आणि एकतंत्री होती. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत उपस्थित राहावे. मतभेदांचे सूर ऐपून संसदेत बोलले पाहिजे, असा सल्लाही मुखर्जींनी दिला आहे.
मनमोहन सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक
2004च्या विजयानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्विकारावे यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. डॉ. सिंग मुळात अर्थतज्ञ आहेत. ते दृढश्चियी आहेत. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. यामुळेच त्यांनी विरोध असतानाही अमेरिकेबरोबर अणुकरार केला. पंतप्रधान म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली, असे मुखर्जींनी म्हटले आहे.

























































