
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग आणि मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातर्फे संशोधन करणाऱ्या एम.फिल आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.
विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रे 1ते 30 जून या कालावधीत शैक्षणिक कामकाजासाठी बंद राहतील, परंतु या कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार ऑनलाईन अथवा दूरस्थ माध्यमातून शैक्षणिक कामकाज करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या आहेत.
विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सर्व संशोधन केंद्रांना यंत्रणा उभारण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच मार्गदर्शकांनी संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी ट्रॅकिंग सिस्टिम अद्ययावत करणे आवश्यक आहे असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होईल त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते. राज्य सरकारनेही यानुसार निर्णय घेऊन परीक्षा रद्द केली. पण राज्यपालांनी केलेल्या विरोधामुळे सरकारने अद्यापही लेखी आदेश काढलेला नाही. त्यामुळे परीक्षा होणार की नाही यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान पुणे विद्यापीठाने पूर्वीच्या आदेशानुसार विद्या परिषदेत परीक्षा पद्धतीवर निर्णय घेतला आहे. त्यावर सोमवारी व्यवस्थापन परिषदेत चर्चा करण्यात आली. अनेक सदस्यांनी परीक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवावी असा निर्णय घेतला आहे. तसेच याचे अधिकार कुलगुरूंकडून देण्यावर सोमवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.



























































