वाढीव बीज बिलाच्या तक्रारींचा महावितरणच्या दारी खच! ग्राहकांकडून दररोज हजारभर तक्रारी

605

वाढीव वीज बिलाविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मिस्ड कॉलच्या माध्यमातून दररोज हजार-बाराशे तक्रारी नोंदवत आहेत. तसेच ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर महावितरणकडून तत्काळ संपर्क साधला जात आहे. तसेच इमेलवरही मोठय़ा प्रमाणात तक्रारी नोंदवल्या जात असल्याचे समोर आले आहे.

महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी ग्राहक असून त्यामध्ये जवळपास दोन कोटी घरगुती ग्राहक आहेत. लॉक डाऊनमध्ये वीज वापराचे प्रत्यक्ष रिडींग न झाल्याने जूनमध्ये असलेल्या वीज बिलात गोलमाल झाल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. त्याची दखल घेत ग्राहकांना वीज बिल समजावून संगण्याबरोबरच त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी 9833567777 आणि 9833717777 हे दोन हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. त्यावर ग्राहकाने मिस्ड कॉल दिल्यानंतर ग्राहकाने समोरून कॉल करून त्यांची तक्रार जाणून घेतली जाते. त्यानुसार या हेल्पलाईनवर दररोज एक हजार ते बाराशे तक्रारी येत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. ज्या ग्राहकांना खऱया अर्थाने वाढीव बिल आले आहे, त्याचे बिल कमी केले जात आहे.

वाद घालण्यासाठी ग्राहकांचे कॉल
वीज बिलात कोणताही गोंधळ नसताना किंवा वाढीव वीज बिल आलेले नसतानाही अनेक घरगुती ग्राहक मिस्ड कॉलद्वारे आपली तक्रार नोंदवतात. त्यानंतर कॉल सेंटर मधून त्यांना कॉल केल्यानंतर वीज पुरवठा खंडित होणे, कमी व्होल्टेज, मागील तीन महिने वीज बिल भरणा केंद्र का बंद ठेवली याबाबत वाद घालत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या