पत्रकारितेतील वेधक अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>श्रीकांत आंब्रे

गेल्या चार दशकांत गोवा आणि महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून काम करताना आलेल्या विविध संस्मरणीय आठवणींचा ज्येष्ठ पत्रकार कामिल पारेख यांचा गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेवरील लेखसंग्रह वाचताना त्यांचं पत्रकार या नात्याने समृद्ध झालेलं जीवन अनुभवायला मिळतं. 1980 ते 1990 दरम्यान गोव्यात पणजीतल्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून नोकरीस लागलेल्या कामिल यांनी कॅम्पस रिपोर्टरपासून क्राईम, डिफेन्स, हायकोर्ट, गोवा विधानसभा, राजकीय बातमीदारीच्या क्षेत्रापर्यंत विविधांगी विषयावर बातम्या, वृत्तांत लिहिले. अनेक प्रकरणे उघडकीस आणली. पत्रकारितेत शिरल्यानंतर आधी लखनौ विद्यापीठात आणि नंतर पूर्व युरोपातील बल्गेरिया येथे पत्रकारितेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. वयाच्या विशीपासून सुरू केलेली पत्रकारिता हा त्यांच्या जगण्याचाच एक भाग बनली.  प्रत्येक बिट्स सांभाळताना बाळगावी लागणारी वेगवेगळी अवधाने,  घटनांचे लावण्यात येणारे अन्वयार्थ यातून त्यांची घडत असलेली शैली हा त्यांच्या लेखनस्वभावाचा भाग बनत गेला. स्वतः पडद्यामागे राहून विविध घटनांवर, प्रमुख व्यक्तींवर, त्या त्या काळातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी ही रिपोर्टरियल शैली त्यांच्या या लेखसंग्रहाचं प्रमुख आकर्षण आहे.

या लेखसंग्रहातील 29 लेख म्हणजे त्यांच्या जुन्या लेखांचे पुनर्मुद्रण नाही, तर त्या त्या वेळी दिलेल्या महत्त्वाच्या बातमीमागच्या कडू-गोड वेधक आठवणी आहेत. या लेखसंग्रहातून पत्रकारितेच्या विविध अंगांची बिट्सची आणि कामाच्या पद्धतीची झलक दिसतेच, परंतु एखादी बातमी मिळविण्यासाठी पत्रकाराला करावी लागणारी धडपड, त्या बातमीत ओतावा लागणारा जीव, विविध प्रसंगांना सामोरे जाताना जिवाची होणारी घालमेल, मोठय़ा राजकीय व्यक्तिमत्त्वांची आदब राखण्यासाठी पत्रकार म्हणून स्वतःचा स्वाभिमानही दुखावला जाणार नाही याची काळजी घेण्याची मिळालेली शिकवण यासारख्या बारीकसारीक गोष्टींची जपणूक करत आपला पत्रकारितेचा धर्म सांभाळताना जपावा लागणारा निःपक्षपातीपणा आणि सत्याची पाठराखण याचे कितीतरी दाखले त्यांच्या या लेखसंग्रहात मिळतात.

गोव्यात कॅपिटेशन फीवर आधारित व्यावसायिक कॉलेज सुरू करण्याच्या सरकारी निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थिनींवर केलेला लाठीमार, त्याचे वृत्तपत्रातून गाजलेले फोटो, त्यामुळे गोवा सरकारची झालेली नाचक्की आणि त्यानंतर त्याच्या वृत्तपत्राला आलेली बरकत याची हकीकत एखाद्या कथेप्रमाणे कामिल रंगवून सांगतात.

इंदिरा गांधी, अटल बिहारी, नरसिंह राव, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर या नेत्यांशी त्यांची भेट झाली. त्यातून बऱयाच आतल्या बातम्या समजल्या. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पुढच्या दोन-तीन दिवसांत होणाऱया भीषण नरसंहाराची चुणूक त्यांनी पणजीत पाहिली होती. राजीव गांधीची हत्या, व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरणातून दिलेला सरकारचा राजीनामा, काँग्रेस सरकारला लागलेले ग्रहण टिपताना वृत्तांकन करताना स्वतःच्या बातमीतील दोषांची जाणीवही त्यांना प्रकर्षाने होत होती. वृत्तपत्र कामगार चळवळी, स्मगलर बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकल्यावर मनाला लागलेली रुखरुख, पद्मभूषण दिलेल्या पुण्यातील शकुंतलाबाई परांजपे यांच्याशी जडलेले ऋणानुबंध आणि त्यांच्या स्नेहमय परिचयातून त्यांनी रेखाटलेले शकुंतलाबाईंचे हृद्य व्यक्तिचित्र ही कामिल यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाची एक बाजू म्हणून समोर येते. म्हापशाला  न झालेल्या एका रॅगिंग प्रकरणाची दिलेली बातमी आणि त्यामागचे सत्य, हाडाचे पत्रकार प्रकाश वर्दळे यांचे मौलिक मार्गदर्शक, गोव्यातील गणेशोत्सव, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या केबिनबाहेर ताटकळत बसलेले एकेकाळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विदुषी इरावती कर्वे यांच्या लेखनावरील प्रेम, 70 च्या दशकातील दुष्काळाच्या झळांच्या आठवणी, गोव्यातील गमतीदार कार्निव्हल उत्सव, समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांचे व्यक्तिचित्र, व्हॅटिकन सिटी, रोम, व्हेनिसला दिलेली भेट इत्यादींवरील त्यांचे सर्वच लेख वाचनीय आहेत.

मात्र गोव्यात त्यांच्या पत्रकारितेचे रुजलेले रोप त्यांच्या प्रयत्नांमुळे बहरले. गोव्याच्या राजकारणाची, तेथील नेत्यांची, मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, प्रतापसिंग राणे, शशिकांत काकोडकर, रमाकांत खलप इत्यादी नेते आणि गोवा-दीव-दमणमध्ये रमलेले मन, बातमीदाराचे वेगळे जग त्यांच्या पत्रकारितेला नवा आयाम देऊन गेले. पत्रकाराला शेवटी प्रत्येक बातमी किंवा वृत्तांत लिहिताना, घटना वा नेत्यांबद्दल लिहिताना काही गोष्टी पडद्याआड ठेवाव्याच लागतात. त्या फक्त त्यानाच माहीत असतात. त्या कधीच उघड न करण्यामागे कोणाचीही प्रतिमा डागाळू नये हा अलिखित संकेत असतो, त्याचे भान ठेवावे लागते. तरीही कामिल यांची पत्रकारिता ही बावनकशी आहे हे नाकारता येत नाही.

गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा

लेखक:- कामिल पारेख

प्रकाशक:- चेतक बुक्स, पुणे

पृष्ठ:- 183, मूल्य:- रुपये 300/-