
हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारातून गेल्या अनेक महिन्यांपासून टॅरीफच्या नावावर धमकावणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनने सडेतोड उत्तर दिलं आहे. या करारामुळे हिंदुस्थान आणि युरोपियन युनियन दोघांसाठीही नवीन बाजारपेठा उघडल्या झाल्या आहेत. मात्र यामुळे आताच खूश होण्याची गरज नाही. कारण हा करार आताच झाला असून प्रत्येक्षात हा करार कधी लागू होईल किंवा हा करार लागू होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील या व्यापार कराराला दोन्ही बाजूंनी ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असल्याचं म्हटलं जात आहे. हा करार हिंदुस्थान आणि युरोपियन युनियन यांच्यातील आहे, परंतु युरोपियन युनियन हा एकटा देश नाही तर २७ देशांचा समूह आहे. या अर्थाने हिंदुस्थानने मिळवलेली नवीन बाजारपेठ ही एका देशाची नाही तर २७ देशांची बाजारपेठ आहे. म्हणजेच हिंदुस्थानला याचा फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं आहे. संख्येच्या बाबतीत हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील आतापर्यंतचा एकूण व्यापार १९० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचा आहे.
यापैकी, व्यापारी क्षेत्राचा व्यापार अंदाजे १३६.५३ अब्ज डॉलर्स आहे. यापैकी हिंदुस्थानची निर्यात अंदाजे ७५.८५ अब्ज डॉलर्स आहे, तर आयात अंदाजे ६०.६८ अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ असा की, या व्यापार कराराशिवायही हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील व्यापारात हिंदुस्थानचा व्यापार अधिशेष होता. म्हणजेच हिंदुस्थानने जास्त विक्री केली आणि कमी खरेदी केली.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे युरोपियन बाजारपेठेत हिंदुस्थानी वस्तूंची मागणी वाढेल, ज्यामुळे युरोपियन बाजारपेठेत हिंदुस्थानच्या निर्यातीत वाढ होईल. सध्या हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील एकूण सेवा व्यापार अंदाजे 83 अब्ज डॉलर्स इतका आहे. व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर हा व्यापार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

























































