
पालघर पूर्वेतील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये आज संध्याकाळी भीषण स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले असून त्यांना विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रसायनाचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरातील अन्य कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये विविध प्रकारचे कारखाने असून त्यात लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज आहे. आज संध्याकाळी अचानक कंपनीमध्ये स्फोट होताच एकच पळापळ झाली. त्यात दीपक अंधेर (३२) या कामगाराचा मृत्यू झाला. जखमींमध्ये दिनेश गडग (४०, रा. वरखुंटी) आणि सुरेश कोम (५५, रा. शेलवली) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तसेच लक्ष्मण मंडळ (५१) आणि संतोष तरे (४६) हे जखमी असून त्यांना रिलीफ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार दिले जात आहेत. लिंबानी सॉल्ट कंपनीमध्ये अॅसिड व मेटल यांचे मिश्रण करून रासायनिक प्रक्रिया सुरू होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक या प्रक्रियेदरम्यान मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि लगेचच परिसरात गोंधळ उडाला.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रासायनिक प्रक्रिया सुरू असतानाच स्फोट झाला. मात्र नेमकी ही घटना कशामुळे झाला याची प्राथमिक चौकशी सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पालघर पोलीस, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, महावितरण विभाग घटनास्थळी पोहोचले असून घटनेची चौकशी व तपासणी सुरू आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी सांगितले. या भीषण स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात भीतीचे व वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.