हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंबद्दल व्यक्त केली चिंता, सीपीआर प्रणालीचे शिक्षण शाळेपासूनच द्या! शिवसेनेची लोकसभेत आग्रही मागणी

‘हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थीदशेतच सीपीआर प्रणाली शिकवण्याचा विचार सरकारने करावा,’ अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने आज लोकसभेत करण्यात आली. शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांनी नियम 377च्या माध्यमातून हा विषय मांडला.

‘देशात हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक दुर्दैवाने पहिला आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात 14 हजार 327 जण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे,’ याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.

‘अनेकदा वृद्ध नागरिकांना रस्त्यातच हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. हृदयविकारावरील उपायांबद्दल असणारी अनभिज्ञता आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत करावयाचे प्रथमोपचार या गोष्टींची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर सीपीआर पद्धतीचे शिक्षण शालेय स्तरावरच दिल्यास विद्यार्थ्यांना हृदयविकाराच्या रुग्णांवर प्रथमोपचार करता येऊ शकतात व अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे सरकारने हे शिक्षण सुरू करण्याचा विचार करावा,’ अशी मागणी देसाई यांनी केली.