डिसेंबर पर्यत कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण करा – आमदार वैभव नाईक

28

सामना प्रतिनिधी । मालवण

वाहतुकीस धोकादायक बनलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची आम. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी पाहणी केली. पुलाच्या दुरुस्ती कामाच्या वाढीव साडे सात कोटींच्या नवीन आराखड्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर ठेकेदारास नव्या आराखड्यानुसार कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.

दरम्यान अवजड वाहनांसाठी पूल बंद असल्याने नागरिक व वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत दिलेल्या मुदतीत कोळंब पुलाचे दुरुस्ती काम पूर्ण करावे. अशा सूचनाही आम. नाईक यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मालवण आचरा मार्गावरील कोळंब पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या पुलावरून गेले वर्षभर अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यानंतर आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्षात दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली त्यावेळी पुलाची स्थिती अधिकच धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने आराखडा बनवून शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला. या नवीन आराखड्यासाठी आणखी ३ कोटी निधीची गरज असल्याने आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून शासनाने एकूण ७ कोटी ५० लाख रुपये निधीच्या नवीन दुरुस्ती आराखड्याला मंजुरी दिली होती. मात्र नवीन आराखड्याप्रमाणे पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यास वर्क ऑर्डर मिळाली नसल्याने जुन्या आराखड्याप्रमाणे गेले सहा महिने काम सुरू आहे. मात्र आता शासनाने नवीन दुरुस्ती आराखड्याप्रमाणे काम करण्याची ऑर्डर दिली आहे.

शासनाने वर्क ऑर्डर दिल्याने आम. वैभव नाईक यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कोळंब पुलाच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, मालवणचे उपअभियंता प्रकाश चव्हाण, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज साधये, बाबी जोगी, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, पराग खोत, किसन मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी आम. नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी पुलाच्या दुरुस्ती कामाबाबत चर्चा करून पुलाची स्थिती आणि चालू असलेले दुरुस्तीचे काम याबाबत माहिती घेतली. कोळंब पूल अवजड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांना गेले वर्षभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवीन आराखड्यास वर्क ऑर्डर मिळाल्याने पुलाचे दुरुस्तीचे काम नव्या आराखड्यानुसार गतीने व चांगल्या पद्धतीने करावे. या कामासाठी डिसेंबर पर्यंत मुदत असल्याने दिलेल्या मुदतीत दुरुस्ती काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना यावेळी आम. वैभव नाईक यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या