
अमित घोडेकर,[email protected]
फेसबुक… सर्वाधिक लोकप्रिय समाजमाध्यम… आज त्याच्या संस्थापकालाच बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत… हे कसं होऊ शकतं…?
मी सुरू केलेली कंपनी मलाच कशी त्यातून बाहेर काढू शकते? जिच्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, एका छोटय़ा गॅरेजमध्ये ऑफिस टाकून तेथे कॉम्प्युटर बनवला, जो जगातला सगळ्यात यशस्वी संगणक झाला, पुढे त्याच्या अनेक नवीन आवृत्त्या निघाल्या आणि अवघ्या 10 वर्षांत मी जगातील सगळ्यात यशस्वी व्यक्ती झालो. एका छोटय़ा गॅरेजमध्ये 2 कर्मचारी असलेल्या माझ्या कंपनीची अनेक मोठमोठी ऑफिसेस झाली आणि हजारो लोक माझ्यासोबत काम करू लागले. अशी माझी स्वतःची, मी सुरु केलेली ‘’अॅपल’’ ही कंपनी आज मलाच… तिच्या चेयरमनलाच बाहेर काढते… प्रचंड विमनस्क परिस्थितीमध्ये अखेर स्टीव्ह जॉब्सने ‘’अॅपल’’मध्ये आपला राजीनामा दिला. अखेर 11 वर्षानंतर 1997 साली प्रचंड मानहानी आणि आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या ‘’अॅपल’’ला बाहेर काढण्यासाठी स्वतः स्टीव्ह जॉब्स परतला.
स्टीव्ह जॉब्सप्रमाणे सध्या मार्क झुकरबर्गचंही असंच काहीसं झालंय. इलोन मस्क टेसला या जगप्रसिद्ध गाडी बनवणाऱया कंपनीच्या प्रमुखालाही असंच त्याच्याच कंपनीतून काढण्यासाठी मोठय़ा हालचाली झाल्या होत्या. त्याचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच मार्क झुकरबर्गलरही संक्रांत आलीय आणि जगातील या सगळ्यात जास्त धनाढय़ व्यक्तीला त्याच्याच कंपनीतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
आयुष्य एखाद्या स्वप्नासारखे कुणाचे असेल तर ते मार्क झुकरबर्गचे… मार्कने जी स्वप्ने बघितली, ती सगळी त्याने पूर्ण केली. तो लहान असताना त्याच्या वडिलांना त्याने संगणक शास्त्रात काहीतरी करावे असे वाटत होते, पण सुरुवातीला मार्कला संगणकात काहीही रस नव्हता आणि त्याच्या वडिलांनाही वाटले की आपला मुलगा संगणकात काही दिवे लावू शकणार नाही. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी एका संगणक प्रोग्रामरला आपल्या मुलाला दररोज घरी येवून संगणक शिकवण्यासाठी बोलावले. मार्क मात्र संगणक शिकण्यापेक्षा मासे पकडण्यात जास्त रस होता, त्यामुळे घरी आलेल्या संगणक शिकवणाऱया सरांना तास न तास ताटकळत ठेवून तो मासेमारी करत असे, पण नंतर जगाच्या आणि मार्कच्या नशिबाने त्याला संगणकात थोडंफार कळू लागलं.
कॉलेजमध्ये मार्कने कोर्समॅच नावाचे एक संकेतस्थळ बनवले. याचा वापर करून कॉलेजमध्ये कोणत्या शाखेची निवड करायची, कशी करायची वगैरे अनेक गोष्टी करता येत असत. त्यावेळेस कॉलेजमध्ये फेसबुक नावाचे एक पुस्तक होते. या पुस्तकात सगळ्या कॉलेजमधील मुलामुलींचे फोटो आणि नावे होती, एका आठवडय़ाच्या शेवटी मार्कने फोटो एका संकेतस्थळावर टाकले आणि यातली सगळ्यात सुंदर मुलगी आणि मुलगा कोणता असे विचारत त्यांना मत द्यायला सांगितले. सोमवारी सकाळी कॉलेज व्यवस्थापनाने ते संकेतस्थळ बंद केले. त्याचं कारण म्हणजे दोन दिवसात संकेतस्थळावर प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांनी त्यांची मत नोंदवली होती… आणि मत नोंदवताना सगळ्यांनीच त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. त्यामुळे कॉलेजमधील कुचकामी संगणकप्रणाली बंद पडली आणि अनेक मुलींनी आपले फोटो आपल्याला न विचारता मार्कच्या संकेतस्थळाने वापरले याची तक्रारदेखील केली. तोपर्यंत सुट्टीवर असलेल्या मार्कला हे कळले तेव्हा त्याने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि पुढच्या अवघ्या काही महिन्यात फेसबुक नावाचे जगातील पहिले सोशल संकेतस्थळ सुरु केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या डेटा चोरी प्रकरणाचे सगळे खापर सध्या मार्क झुकरबर्गवर फोडले जात आहे. त्यामुळे तो मोठय़ा अडचणीत सापडलाय आणि त्याचीच कंपनी त्याला घरी बसायचा सल्ला देवू लागलीय. आता हेच बघायचंय की तोही स्टीव्ह जॉब्सप्रमाणे या संकटातून तावून सुलाखून बाहेर पडतो की नाही..?
























































