
सामना प्रतिनिधी, मुंबई
पोलीस निरीक्षकाचा पेहराव करून अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राडा करणाऱया तोतया पोलीस अधिकाऱयाला डी.एन. नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. पैसे उकळण्याच्या बेतात तो होता. पण त्याआधीच खऱया पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्या भामटय़ाविरोधात महिलांची छेड काढल्याचे गुन्हे दाखल आहेत.
ईश्वर अडवाणी (55) असे त्या भामट्याचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा ईश्वर पोलीस निरीक्षकाच्या वेशात अंधेरी पश्चिमेकडील अंधेरी रिक्रिऐशन क्लब येथे गेला. बराच वेळ बाहेर घुटमळल्यानंतर तो नैसर्गिक विधी करण्याच्या बहाण्याने क्लबमध्ये गेला. आत गेल्यानंतर तो क्लबच्या लॉबीत उभा राहून एका सदस्याकडे बघू लागला. यामुळे त्या सदस्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने माझ्याकडे अशा प्रकारे बघू नका, असे सांगितले. यावर तू कोणाशी बोलतोस, पोलीस अधिकाऱ्याशी नीट बोलायचे असा दम अडवाणी त्याला देऊ लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मग त्याचे पर्यवसाण हाणामारीत झाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले.
त्यानुसार डी.एन. नगर पोलीस क्लबमध्ये गेल्यावर अडवाणीचे पितळ उघड पडले. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे पोलीस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र सापडले. तसेच त्याने पोलीस निरीक्षकाचा गणवेश घातलेला होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन अडवाणीची चौकशी केल्यावर तो म्हणाला की, हॉटेल कर्मचाऱ्यांना धमकावून पैसे उकळायचे होते नाहीतर फुकटात खायचे होते. डी.एन. नगर पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या आहेत. ईश्वर अडवाणी याच्या विरोधात महिलांची छेड काढल्याच्या तक्रारी असून तो रेकॉर्डवरचा आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.




























































