प्रवासासाठी बनावट इ-पास बनविणाऱ्याचे बिंग फुटले, हडपसरमध्ये तरूणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना बनावट इ-पास तयार करून देउन शासनाची फसवणूक करणाऱ्याचे सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा विरोधी पथकाने बिंग फोडले आहे. संबंधित तरूणाला अटक करण्यात आली आहे. धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसह महत्वाच्या कामांमध्ये प्रवास करताना अडथळा निर्माण होउ नये, यासाठी शासनाने इ-पास बंधनकारक केला आहे. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांच्या वेबसाईटवर फॉर्म भरून इ-पास मिळविल्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित सेवेचाही गैरफायदा घेउन स्वतःच्या आर्थिंक हितासाठी तरूण हडपसरमध्ये नागरिकांना बनावट इ-पास वितरित करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी भेकराईनगरमधील विश्वसृष्टी सोसायटीतील तरूणाच्या घरी छापा टाकला. त्यावेळी धनाजी गंगनमले लॅपटॉपवर बनावट इ-पास बनवून नागरिकांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, इरफान पठाण, नीलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांच्या पथकाने केली.