
हिंदुस्थानी चलनासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचा साठा केलेल्या टोळीला लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेने विमाननगर भागात पकडले. त्यांच्याकडून 44 कोटी रुपयांचे बनावट चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपयांचे बनावट अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकजण लष्करी सेवेत आहे.
शेख अलीम गुलाब खान, सुनील बद्रिनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तौफिल अहमद मोहमंद इसाक खान, अब्दुल गनी रेहमतुल्ला खान, अब्दुल रेहमान अब्दुल गनी खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
विमाननगर भागातील संजय पार्क परिसरात बनावट हिंदुस्थानी चलन आणि अमेरिकन डॉलरचा मोठय़ा प्रमाणावर साठा केल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेने याबाबतची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने सापळा रचून सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शेख अलीम गुलाब खान मुख्य सुत्रधार असून, तो बॉम्बे सॅपियर्समध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली.
एक वर्षभरापूर्वी त्याने संजय पार्क परिसरात एक बंगला भाडय़ाने घेतला होता. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी चिल्ड्रेन बँकेसाठी वापरण्यात येणाऱ्या नोटा एकत्रित करण्याचे काम तो बंगल्यामध्ये करीत होता. त्यानंतर नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. त्यासाठी कोंढव्यातील सुनील सारडा त्याला मदत करीत होता. त्यानंतर ठिकठिकाणी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मुंबईतील रत्नाकर, तौफिल, अब्दुल, अब्दुल गनी हे बनावट नोटांची वाहतूक करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, सुनील पवार, गणेश साळुंके, सुरेंद्र साबळे, दत्तात्रय फुलसुंदर, रमेश राठोड, सययद यांच्या पथकाने केली.
नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सहाजणांच्या टोळीने बनावट नोटांचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. टोळीने बनावट नोटा कोठून आणल्या, त्यांनी कितीजणांची फसवणूक केली आहे, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.






























































