Punjab Election 2022 पंजाबमध्ये बनावट केजरीवाल फिरतोय, जपून रहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे एक सभा घेतली. यावेळी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलगी, सून, सासू यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला हजार रुपये जमा केले जातील, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. तसेच पंजाबमध्ये एक बनावट केजरीवाल फिरतोय. मी जी काही घोषणा करतोय तिच घोषणा दोन दिवसानंतर तो करतोय, मात्र कामाच्या नावाने बोंब आहे, असे म्हणत केजरीवाल यांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला.

केजरीवाल पुढे म्हणाले की, त्यांनी (चरणजीत सिंह चन्नी) पंजाबमध्ये वीज मोफत देण्याची घोषणा केली, परंतु कोणालाही मोफत वीज मिळाली नाही. आपचे सरकार आल्यास पंजाबचे भविष्य उज्ज्वल होईल. वीजबिल शून्य करण्याचे काम फक्त हा केजरीवाल करू शकतो, बनावट केजरीवाल नाही, असेही ते म्हणाले.

केजरीवाल यांनी आरोग्यसेवेबाबतही भाष्य केले. मोहल्ला क्लिनीक बनवण्यासाठी 20 लाख रुपये लागतात आणि हे फक्त 10 दिवसांचे काम आहे. हे काम बनवाट केजरीवाल नाही तर असली केजरीवाल करू शकतो, असेही ते म्हणाले.