बनावट पोस्टल स्टॅम्प बनवून देशभरात विक्री, पाच जणांची टोळी जेरबंद; 27 लाखांचे बोगस स्टॅम्प जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट पोस्टल स्टॅम्प बनवून त्याची देशातील विविध राज्यांत विक्री करून भारतीय डाक विभागाची आर्थिक फसवणूक करणारी एक टोळी गजाआड करण्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यातील मुख्य आरोपींकडून 27 लाख 84 हजार 200 रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

बनावट पोस्टल स्टॅम्पची खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती मुंबई जीपीओतील डाक निरीक्षक आशुतोष कुमार (43) यांना मिळाली. त्यांनी तत्काळ माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक योगेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनेश सातार्डेकर तसेच हाके, मंडले, कांबळे, पाटील या पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर मुंबईत राहणारा राकेश बिंद याला पकडले. त्याच्या चौकशीत बिहारमध्ये राहणारे शमशोद्दिन गफार आणि शाहिद रजा या दोघांची नावे समोर येताच त्यांना तेथे जाऊन पकडले. या दोघांच्या बँक खात्यात सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या गुह्यातील मुख्य सूत्रधार दिल्ली व गाझियाबाद येथील असल्याचे अटक आरोपींकडून समजले. त्यानुसार पथकाने दिल्लीत तळ ठोकून त्या दोघांचा शोध घेतला. अखेर मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि विरेंदर प्रसाद यांना अटक केली.

कुरियरद्वारे विविध राज्यांत पाठवणी

मोहम्मद शहाबुद्दीन शेख हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 22 लाख 84 हजार 200 रुपयांचे, तर विरेंदर प्रसाद याच्याकडून पाच लाख किंमतीचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले. आरोपी बनावट स्टॅम्प बनवून ते कुरियरद्वारे विविध राज्यांत पाठवून देत होते. या स्टॅम्पच्या विक्रीतून आरोपी शासनाची मोठी आर्थिक फसवणूक करीत होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.