पाणीटंचाईने पिचलेल्या कुटुंबाचा गळफास घेण्याचा प्रयत्न, नांदेड जिल्ह्यातील उमरीतील थरार

सिंधी व सिंधी तांडा येथील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला असून, ग्रामपंचायत किंवा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने सिंधी तांडा येथील एका ग्रामस्थाने ग्रामपंचायतीसमोर कुटुंबासह गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्या युवकास सोडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील सिंधी तांडा येथील पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, घागरभर पाण्यासाठी महिला विद्यार्थी व नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला व मुलांना जीव मुठीत धरून 40 ते 50 फूट खोल विहिरीत उतरावे लागते. सततच्या पाणीटंचाईला वैतागून येथील बंजारा समाजाचे अर्जुन जाधव यांनी आई, पत्नी आणि तीन मुलांसह सिंधी ग्रामपंचायतीसमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्यांना सोडवले म्हणून मोठी दुर्घटना टळली. याबाबत उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी याबाबत कसली तक्रार किंवा माहिती मिळाली नसल्याचे सांगत हे प्रकरण ग्रामपंचायत स्तरावर सुरू असल्याचे स्पष्ट केले. या भागाचे आमदार राजेश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्प होऊ शकला नाही.

लाखो रुपयांचा निधी मंजूर, परंतु कामात मोठा भ्रष्टाचार

तांडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने येथील पाणीपुरवठा योजना निष्फळ झाल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील पुयड यांनी केला आहे. उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.आर. आरबडवाड यांनी सिंधी गावालगतच्या शेतातील एक बोअर अधिग्रहण करण्याचे आदेश दिले. परंतु, त्या बोअरलाही पाणी नसल्याची खंत पुयड यांनी व्यक्त केली.