हळदीच्या कार्यक्रमात दादुसकडून गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी परिसरात एका हळदीच्या कार्यक्रमात कोळी गीतांचा प्रसिद्ध गायक संतोष चौधरी ऊर्फ दादुस याने गोळीबार केल्याचा प्रकार घडला. मात्र दादुसने गोळीबार केला ती बंदुक खरी नसून डेमो बंदूक असल्याचे नंतर स्पष्ट झाले. परंतु रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिवडी परिसरात एका तरुणाचा हळदीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला दादुसला बोलविण्यात आले होते. त्याप्रमाणे दादुस कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. मात्र हळदीचा कार्यक्रम रंगात आला असताना दादुसने त्याच्याकडील बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत, भिवंडीत राहणाऱया दादुसकडे जाऊन चौकशी केली. तेव्हा दादुसने वापरलेली बंदुक डेमो वेपन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ती डेमो बंदुक ताब्यात घेतली असून पून्हा असा गंभीर प्रकार करणार नाही असे हमीपत्र त्याच्याकडून लिहून घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दादुसने कार्यक्रमात गंमत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या चांगलाच अंगाशी आला.