प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे पुणे येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार अशी त्यांची ओळख होती.

आज दुपारी 11 ते 2 वाजताच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी प्रभाकर जोग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी दोन वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रभाकर जोग यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांनी वयाच्या बाराव्या वर्षी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले.

एसपी कॉलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेह संमेलनात व्हायोलिन वाजवत. यावेळी ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी जोगांचे व्हायोलिन वादन ऐकले आणि त्यांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.