रिक्षा- टॅक्सी ग्राहकांसाठी ‘क्यूआर कोड’युक्त भाडे चार्ट; प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी आरटीओची आयडीया

रिक्षा- टॅक्सीच्या ग्राहकांसाठी ‘क्यूआर कोड’युक्त भाडे चार्ट आरटीओने तयार केला आहे. हा ‘क्यूआर’ कोड मोबाईलने स्कॅन करताच परिवहन विभागाची वेबसाईट ओपन होऊन भाडेदर समजून प्रवाशांची फसवणूक टळणार आहे.

काळी – पिवळी टॅक्सी व रिक्षासाठी 1.5 किमीचे अनुक्रमे 28 व 23 रुपये नवे किमान भाडेदर शनिवारपासून लागू होणार असल्याने तसेच नव्या भाडेदरानूसार मीटर रिकॅलीब्रेशन करण्यासाठी वेळ लागणार असल्याने या भाडेदर चार्टवरच विसंबून ग्राहकांना बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नकली चार्ट दाखवून रिक्षा व टॅक्सी चालकांकडून फसवणूक होऊ नये म्हणून ही ‘क्युआर कोड’ची उपाययोजना आणली असल्याचे आरटीओ सूत्रांनी सांगितले.

रिकॅलीब्रेशनकरिता एक महिना मुदत
रिक्षा आणि टॅक्सीचे मीटरचे रिकॅलीब्रेशन करण्यास 1 ऑक्टोबरपासून ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुदत दिली आहे. तसेच चालकांना 1 ऑक्टोबरपासून ‘क्यूआर कोड’युक्त भाडे चार्ट मिळणार असल्याने‌ ग्राहकांची सोय होणार असल्याचे डेप्युटी आरटीओ भरत कळसकर यांनी सांगितले.