राज्यसभेतील 59 सदस्यांना निरोप राजकारणात फुलस्टॉप नसतो! नरेंद्र मोदी यांच्या निवृत्त खासदारांना शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
saamana news pm modi presents manav vision for ai at impact summit 2026

‘राजकारणात फुलस्टॉप नसतो. राज्यसभेतून निवृत्त झालेले सदस्य यापुढेही आपल्या अनुभवाच्या आधारे सामाजिक जीवनात योगदान देतच राहतील. भविष्य त्यांची वाट पाहत आहे,’ अशी सदिच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 59 सदस्यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. त्यावेळी मोदी बोलत होते. ‘संसद हे एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठात येणारा माणूस सहा वर्षांनी जेव्हा जातो तेव्हा तो असंख्य अनुभवांनी आणि अनेक पटींनी समृद्ध होऊन जातो. आता निवृत्त होणाऱया व पुन्हा न येणाऱया सदस्यांनी या अनुभवाचा उपयोग देशासाठी करावा,’ असे आवाहन मोदींनी केले.

शरद पवार, खरगे, देवेगौडांचे केले कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, जनता दल सेक्युलरचे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेदेखील राज्यसभेतून निवृत्त झाले. पंतप्रधान मोदी यांनी या तिघांचा आवर्जून उल्लेख करत त्यांच्या कार्याचे काwतुक केले. ‘पवार, खरगे आणि देवेगौडा यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य संसदीय राजकारणात गेले आहे. इतकी वर्षे ते समर्पित होऊन काम करत आहेत. इतर सर्व सदस्यांनी त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे,’ असे मोदी म्हणाले.

खरगे यांची टोलेबाजी

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. ‘देवेगौडांना मी 54 वर्षांपासून ओळखतो. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं. पण नंतर काय झालं माहीत नाही. त्यांनी प्रेम आमच्यासोबत केलं आणि लग्न मोदींसोबत केलं. मोदींनी ते कसं मान्य केलं माहीत नाही,’ असा टोला खरगे यांनी हाणला. रामदास आठवले यांना खरगे यांनी चिमटा काढला. ‘आठवले हे कायम कवितेच्या माध्यमातून मोदींचे गुणगान गातात. मोदींच्या कौतुकाशिवाय दुसरी कविताच त्यांना येत नाही. पुढची सहा वर्षे ते असल्या कविता कमी करतील,’ अशी अपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली.