
सामना प्रतिनिधी । जालना
शिवसेनेचा दणका बसताच जिल्ह्याच्या खरीप विमा नुकसान भरपाई रकमेत तब्बल 22 कोटीची वाढ करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 9 मे रोजी जालना येथे पिक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई द्यावी नसता त्यांना सरळ करु, असा इशारा दिला होता. याच वेळी त्यांनी विम्या संदर्भात सगळी आकडेवारी जमा करण्यासाठी तालुकास्तरावर शिवसेनेच्या वतीने पिकविमा मदत केंद्र सुरु करण्याचेही आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात शेतकऱ्यांसाठी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने पिकविमा मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. या मदत केंद्रात जवळ-जवळ 20 हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून अजूनही तक्रारीचा ओघ सुरुच आहे.
जालना जिल्ह्यामध्ये खरीप 2018-2019 मध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड या कंपनीला पिकविम्याचे काम देण्यात आले होते. आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडे पिक विमा उतरविण्यासाठी 8 लाख 32 हजार 319 अर्ज दाखल करण्यात आले. यातील 3 लाख 79 हजार 339 अर्जाचा पिक विमा मंजुर करण्यात आला असून यासाठी पुर्वी कंपनीचे 65 कोटी रुपये मंजुर केले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा देताच विमा कंपनीने जिल्ह्यासाठी आणखी 22 कोटी रुपये वाढवून दिले आहेत. यातील 45 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून अद्याप 42 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करणे बाकी आहे. शिवसेनेच्या रेट्यामुळे जिल्ह्यातील तीर्थपुरी आणि सेवली या वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांनाही पिकविमा मिळणार असून तिर्थपुरी मंडळात मुग तर सेवली मंडळात उडीद या पिकास पिक विमा मंजुर करण्यात आला आहे.
आधारचा आधार आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीकडून पिक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र रक्कम जमा करतांना बँकेच्या आयएफएससी कोड आणि इतर त्रुटी मुळे उशीर होवू लागला असल्याने आता आधार क्रमांकाच्या माध्यमातून बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. जिल्ह्यातील 51 मंडळात विविध पिकांना विमा मंजुर करण्यात आला असून कापूस, बाजरी, उडीद,तुर, मुग, मका आदी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी हिस्सा 38 कोटी खरीप पिक विमा भरतांना शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा म्हणून 38 कोटी रुपये कंपनीकडे भरले असून शासनाने शासनाचा हिस्सा 187 कोटी रुपये कंपनीकडे भरले आहेत. 225 कोटी रुपये पिकविम्यासाठी कंपनीकडे असतांना त्या तुलनेत विमा कंपनीकडून फक्त 87 कोटी रुपयेच मंजुर करण्यात आले आहेत.

























































