
वय निव्वळ आकडा असतो. मनात जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. हेच तामीळनाडू येथील 89 वर्षांच्या लक्ष्मी अमाल आणि 71 वर्षीय कस्तुरी सिवरमन या मायलेकीच्या जोडीने दाखवून दिले. देघींनी वृद्धपकाळात स्वतःचे फार्म स्टे सुरू केलाय. दोघी वडिलोपार्जित 185 वर्षे जुन्या शेतात हे फार्म स्टे चालवत आहेत.
लक्ष्मी अमाल आणि कस्तुरी सिवरमन या दोघी रूढी-परंपरेत वाढलेल्या आहेत. दोघींचे शिक्षणही जास्त नाही. घरात त्या कधी स्वतंत्र निर्णय घेऊ शकल्या नाहीत, मात्र तरीही आज त्या आत्मविश्वासाने फार्म स्टे चालवत आहेत. सुरुवातीला दोघींना भीती वाटली. आपल्याला हे जमेल का, अशी शंका त्यांच्या मनात आली. पण त्यांनी मनातील भीती बाजूला सारली.
येणाऱया पाहुण्यांना, पर्यटकांना चांगल्या सुविधा देणे, त्यांना हवे नको ते बघणे, हे खूप दमवून टाकणारे काम आहे. मात्र लक्ष्मी आणि कस्तुरी त्यांच्याकडे सुपरपॉवर असल्यासारखे काम करतात. वयाची सत्तरी पार केलेल्या कस्तुरी आता इंटरनेट कसे वापरावे हे शिकत आहे.
वक्षना फार्म 13 एकर जागेत पसरलंय. ही जागा म्हणजे त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्या जागेत पर्यटकांना शेतात राहण्याचा सुंदर अनुभव घेता येतो. शेतात ताज्या पिकवलेल्या भाज्या, फळे खायला मिळतात. वारसा शेती आहे. पावसाचे पाणी वाचवण्यासाठी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाच तलाव, लाकडी जमीन, दोन मिनी लायब्ररी, घरामध्ये आकर्षक रोपं असे या फार्म स्टेचे वैशिष्टय़ आहे.
























































