अज्ञात व्यक्तीने ऊस जाळल्याने मंगरुळच्या शेतक-याचे पाच लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगरुळ (ता.जळकोट ) येथील शेत शिवारातील एका शेतकऱ्याच्या उभ्या ऊसाला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पेटवून दिल्याचे समोर आले आहे. य़ामुळे या शेतकऱ्याचा 4 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत या शेतक-याचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ता. 29 रोजी दुपारी घडली आहे. या नुकसानीबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

यासंबंधी मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मंगरुळ (ता.जळकोट) येथील शेतकरी मोहम्मद जाकीर शेख यांनी यांनी त्यांच्या गट क्रमांक 280 मध्ये 4 एकर ऊसाची लागवड केली होती. हे शेतकरी आज दुपारी दीडच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता शेतात उभा असलेला चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा ऊस लागलीच काही दिवसात साखर कारखान्याला नेण्यात येणार होता. पण ऊस जाण्याआधीच कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने तो ऊस पेटवून दिला आणि सारा ऊस जळून खाक झाला आहे. जळून खाक झालेला ऊस पाहून आपद्ग्रस्त शेतकरी मोहम्मद जाकीर शेख यांनी फार मोठा धक्का बसला.

या घटनेत त्यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेतक-याने हा ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला नसल्याचे सांगितले. ऊस कोणीतरी पेटवून दिला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तहसीलदार, जळकोट यांना यांना अर्ज देऊन त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.