फडणवीससाहेब, निदान ऐका तरी… शेतकरी अंबादास पवार यांचे आर्जव

शेती करणं परवडत नाही. कर्ज काढून शेती करणे शहाणपणाचे नाही. माझी व्यथा जगासमोर आली. त्यामुळे आता माझे कर्ज माफ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण केवळ माझेच कर्ज माफ करू नका, सगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, अशी मागणी हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी सरकारकडे केली आहे

शेतीचा खर्च परवडत नसल्यामुळे नऊ वर्षांपासून बैल विकून स्वतःच्या खांद्यावर औताचे जू घेतलेल्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या दाम्पत्याची व्यथा ‘सामना’ने जगासमोर आणली. विधिमंडळातही ‘सामना’ने छापलेला अंबादास पवार यांचा फोटो गाजला. त्यानंतर अंबादास पवार यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. कुणी बैलजोडी दिली, कुणी कर्जाची रक्कम भरण्यासाठी पैसे दिले. पण सरकारची तिजोरी अंबादास पवार यांच्यासाठी साधी किलकिलीही झाली नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीचा शब्द ऐकताच फोन ठेवून दिला. राज्याच्या कृषी खात्याने एक पोते खत, किलोभर तुरीचे बियाणे आणि कीटकनाशक पावडरावर अंबादास पवार यांची बोळवण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून अविनाश देशमुख यांनी अंबादास पवार यांना जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यासाठी रोख 40 हजार रुपयांची मदत केली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फोनवरून पवार दाम्पत्याशी संवाद साधला. लातूर येथील काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनीही पवार दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी आदी उपस्थित होते.

फडणवीससाहेब, निदान ऐका तरी

अंबादास पवार शेतीची व्यथा मांडताना हळवे झाले. गेल्या वर्षी सोयाबीनने हात दिला. तीन क्विंटल कापूस झाला. कशी होणार हातातोंडाची मेळवणी? सोयाबीन 4 हजार रुपयाने गेले तर कापूस साडेसहा हजाराने विकला. मशागत, बियाणे, खताचा खर्चही यातून भागला नाही. सोयाबीनचे बियाणेच अडीच हजाराला मिळते. कर्ज काढून कुठवर शेत राखणार? माझे कर्ज माफ करून भागणार नाही, माझ्यासारखे लाखो आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे, असे आर्जव अंबादास पवार येणाऱ्या नेतेमंडळींकडे करत आहेत.