
कुटुंबावर बँकेचे असलेले मोठे कर्ज त्यातच उन्हाळ्यातील तीव्र दुष्काळ व मागील महिन्यातील पावसाने शेतीपिके धोक्यात आल्याने जगायचे कसे? या विवंचनेतच शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या साबळेवाडीतील शेतकरी बाळू सुखदेव चाटे (50) या शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
मागील काही दिवसांपूर्वी वडनेर येथील राजेंद्र नाथा निचित या शेतकऱ्यानेही कर्जबाजारीपणाला व शेतीतून सतत होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता. आता ही शिरूरच्या बेट भागात साबळेवाडी येथील बाळू चाटे या आणखीन एका शेतकऱ्याने याच कारणास्तव आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बाळू चाटे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळू सुखदेव चाटे हे आपल्या आईवडील, 5 भावांसह टाकळी हाजींच्या साबळेवाडी येथे वास्तव्यास आहेत. कुटुंबाचा चरितार्थ केवळ शेतीतील उत्पन्नावरच अवलंबून असल्याने व मागील दोन वर्षात शेतीतून काहीच उत्पन्न हाती न लागल्याने बँकेचे घेतलेले कर्ज वाढतच गेले. ते परत कसे करायचे ? ही चिंता त्यांना सातत्याने सतावत होती. याच कारणास्तव त्यांनी शनिवारी सायंकाळी विष प्राशन केल्याची माहिती चाटे यांचे नातलग व कवठे येमाईचे माजी सरपंच बबनराव पोकळे यांनी दिली.
घटना समजताच ग्रामस्थ नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मंचर, पुणे, पिंपरी येथे हलविले. बाळू चाटे यांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी देखील विविध रुग्णालयात संपर्क साधत तातडीचे उपचार मिळण्याकामी प्रयत्न केले. पण शेवटी रात्री २ च्या दरम्यान बालो चाटे यांची जीवनयात्रा संपली. रविवारी 11 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर साबळेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिरूरचा बेट भाग हा सधन म्हणून ओळखला जात असला तरी शेतकऱयांना मागील दोन वर्षांपासून अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाई दुष्काळ, बेभरवशी झालेली शेती, बँकांची कर्जे, पिकविलेल्या शेतीमालाला न मिळणारे योग्य बाजारभाव व आता परतीच्या पावसाने दिलेला तडाखा या मुळे चांगले शेतकरीही हवालदिल झाले आहेत. या सर्व बाबींना कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी सांगितले.
तर बाळू चाटे या शेतकऱ्याने बँकेकडून सुमारे 4 लाख रुपये कर्ज, त्यावरील सुमारे 2 लाख रुपये व्याज असा सुमारे 6 लाख रुपयांच्या वर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने व शेतीतून ही काहीच उत्पन्न हाती येत नसल्याने त्यांनी शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे व ते काही दिवसांपासून या सर्व बाबींमुळे अत्यंत चिंतेत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाकडून मिळाली. शासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे यांनी केली आहे.





























































