मढेवडगावात विजेच्या तारेला चिटकून शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे शेतात तुटलेल्या विजेच्या तारेला चिटकून शेतकरी रमेश बापूराव सुपेकर (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. रमेश सुपेकर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. शेतावरून गेलेली विजेचा प्रवाह असलेली तार तुटून खाली पडली होती. ऊस मोठा असल्याने त्यांना तारेचा अंदाज आला नाही. त्यांना अचानक तारेचा स्पर्श झाल्याने जोराचा झटका बसला. त्यांनी सुटण्यासाठी धडपड केली परंतु तार चिटकून बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दोन वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या बंडू सुपेकर हा त्यांना शोधण्यासाठी गेला असता त्यांचा तारेला चिटकून मृत्यू झाल्याचे समजले. त्यांच्या पाठीमागे अमेरिकेत नौकरी करत असलेला मुलगा व दोन मुली आहेत. घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भानुदास नवले व पोलीस हवालदार अमोल आजबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विलास दरेकर या तरुण शेतकऱ्याचा तुटलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाला.वीज मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे चार महिन्यातच ही दुसरी घटना घडली आहे. 50 वर्षांपूर्वी जे खांब व तारा बसविण्यात आल्या होत्या त्याच तारा व खांब आहेत. जीर्ण व कमकुवत साहित्य बदलण्याची मागणी करूनही वितरण कंपनीने बदलल्या नाहीत. त्यामुळे अशा घटना होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.