अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेलं, कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

अतिवृष्टीने खरीप पीक पाण्यात गेलं तर रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी शेतात पाणी यामुळे पेरणी करता येत नाही. शासनाची शेतकऱ्यांना दीपाळीपूर्वी मिळणारी मदत अद्यापही मिळालेली नाही. आता कर्जफेड कशी करायची याच विवंचनेतून आरणगाव (पारेवाडी) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारेवाडी येथील शेतकरी महादेव कुंडलिक राऊत (55) यांनी शेतातील नापिकी, शेतात साचलेले पाणी यामुळे अनेक दिवसांपासून नैराश्येत होते. यातच त्यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

महादेव राऊत यांच्या पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत होते. त्यामुळे घरी महादेव राऊत आणि त्यांच्या पत्नी दोघेच राहत होते. राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर पारेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.