पिकविमा कंपनीचा अजब खेळ, शेतकर्‍यांना तलाठी कार्यालयाबाहेर घालावा लागतोय वेळ

74

सामना प्रतिनिधी । पाटोदा

खरिप हंगामाचा पिकविमा भरण्याची अंतीम तारीख जवळ आली आहे. सेतू सुविधा केंद्रावरील सातबारा आठ अ पिकविमा कंपनी स्विकारत नाही आणि तलाठी कार्यालयात खातेदार शेतकरी जास्त असल्याने सातबारा व आठ अ मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकर्‍यांना पिकविमा काढण्यापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाचा व पिकविमा कंपनी अ‍ॅग्रीकल्चर कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तलाठ्याकडून वेळेबर सातबारा व आठ अ चा उतारा भेटू शकत नाही. भेटलाच तर  पिकविमा भरल्या जाणारे संकेतस्थळही तांत्रिक अडचणींमध्ये असल्याने पाटोदा परिसरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरिप हंगामाचा पिक विमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. तीन दिवसांवर अंतिम मुदत आली असून पिकविमा भरण्यासाठी तलाठ्याचा सही शिक्का असलेला सातबारा ब आठ अ चा उतारा बंधनकारक करण्यात आला आहे. परंतू पाटोदा येथील तलाठ्याकडे तीन सज्जाचा कारभार आहे. त्यामध्ये जवळपास १६ हजार खातेदार शेतकरी असून एवढ्या लोकांचे सातबारा आठ अ काढणे जिकरीचे बनत आहे.

सेतू सुविधा केंद्रावरून काढलेला सातबारा ग्राह्य धरण्यात येत नाही. त्यामुळे तलाठ्याकडे सातबारा काढण्यासाठी सध्या शेतकर्‍यांची मोठी गर्दी आहे. त्यात मोठ्या कष्टात पाठपुरावा करून सातबारा मिळाला तर ऑनलाईन पिकविमा भरण्यासाठी असलेले संकेतस्थळ पूर्ववत होत नाही. अशा स्थितीत पाटोदा परिसरातील पिकविमा भरण्यास अडचणी तांत्रिक अडचणींमुळे सातत्याने बंद पडत आहे. शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला. मुदतवाढ देण्याची मागणी पाटोदा व  तालुक्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे. प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या