महामार्ग रोखले; रेल्वे, बस वाहतूक ठप्प! पंजाब, हरयाणा, राजस्थानात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला. अनेक महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. देशात इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

राजधानी दिल्लीच्या सिंघु, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर हजारो शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शुक्रवारी 120 दिवस झाले. या चार महिन्यात शेतकऱयांनी अनेकदा आंदोलन केले आहे. संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत 12 तास बंदची हाक दिली होती. शेतकऱयांनी पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद पंजाब, हरियाणात उमटले.

अमृतसर, जालंधर, लुधियाणा, फिरोझपूर, अंबाला, भटिंडा, जिंद, झंझार, पांचकुला, रोहतकसह अनेक ठिकाणी शेतकऱयांनी रेल्वे रूळांवर आंदोलन केले. किमान 35 प्रवासी रेल्वे आणि 40 वर मालगाडय़ांची वाहतूक ठप्प झाली.
पंजाबमध्ये सरकारी आणि खासगी बस वाहतूक बंद होती. हरियाणातही बस वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री मुलचंद शर्मा यांनी दिली.
अंबाला पॅन्टोन्मेंट येथे शहापूर गावात शेतकऱयांनी मोठे आंदोलन केल्यामुळे दिल्लीकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प होती.
अनेक टोलनाक्यांवर शेतकऱयांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलन केले.
पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तरप्रदेशात दुकाने बंद होती.
दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली होती.
बंद काळात अनेक ठिकाणी पोलिसांसह निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.