मोसंबीच्या बागेत गांजाची लागवड, साडेपाच लाखांची 129 झाडे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मोसंबीच्या बागेत गांजाची लागवड केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथे उघडकीस आली. पोलिसांनी शेतकऱयावर गुन्हा दाखल करून पाच लाख 65 हजार रुपये किमतीची 129 गांजाची झाडे जप्त केली आहेत. या झाडांचे वजन 113 किलो आहे.

अरुण बाजीराव आठरे (वय 44, रा. बोरवलवस्ती, आखतवाडे, ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. शेवगाव ठाण्याचे परिविक्षाधीन अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलीस पथकाने आखतवाडे येथे छापा टाकला. यावेळी आठरे याने मोसंबीच्या बागेत गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ही झाडे जप्त करून अरुण आठरे यास ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक निरीक्षक विश्वास पावरा, आशीष शेळके, परशुराम नाकाडे, उमेश गायकवाड, सुजित सरोदे, सुनील रत्नपारखे, सचिन खेडकर, एकनाथ गर्कल, वैभव काळे, रूपाली कलोर यांच्या पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार राहुल गुरव, अनुप कुलकर्णी यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला.