
राजेश चुरी
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि गव्हाची कापणी या प्रमुख कारणांमुळे नवी दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन थंड पडले होते. पण पश्चिम बंगाल व अन्य राज्यांमध्ये भाजपचे झालेले पानिपत आणि गव्हाची कापणी करून नव्या दमाने येणाऱया शेतकऱयांच्या फौजेमुळे नवी दिल्लीच्या सिंघु बॉर्डरवर उद्या सोमवारपासून शेतकऱयांचा पुन्हा एकदा एल्गार पेटणार आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील 26 नोव्हेंबरपासून नवी दिल्लीच्या सीमेवर देशातील खास करून उत्तरेतील शेतकऱयांनी जबरदस्त आंदोलन पुकारले. संपूर्ण देशातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. आजचा आंदोलनाचा 172 वा दिवस होता. आतापर्यंत या आंदोलनात देशातील 479 शेतकरी वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले. तरीही आंदोलन सुरूच आहे.
मध्यंतरीच्या काळात आंदोलक शेतकऱयांचे मनोधैर्य खच्ची झाले होते. पण पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवानंतर आंदोलकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. आता गव्हाची कापणी करून शेतकरी पुन्हा आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर परतण्यास सुरुवात झाल्याने उमेद वाढली आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्रातील नेते संदीप गिड्डे यांनी ‘गाझीपूर बाँर्डर’वरून बोलताना सांगितले.
संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांसह राष्ट्रीय पातळीवर शेतकरी नेत्यांची सिंघु बॉर्डरवर सोमवार 10 मे रोजी राष्ट्रीय परिषद होणार आहे. यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. पश्चिम बंगालमध्ये ‘नो व्होट टू बीजेपी’ ही मोहीम राबवली होती. तशीच मोहीम उत्तर प्रदेश व इतर राज्यांत राबवली जाईल.
– संदीप गिड्डे, संयुक्त किसान मोर्चाचे नेते
उत्तरेतील राज्यांमध्ये गव्हाचे पीक कापणीला आल्याने शेतकरी कापणीसाठी माघारी फिरले. तरीही आजच्या घडीला गाजीपूर बॉर्डरवर सुमारे 600 ते 700, टिकरी बॉर्डरवर दीड हजार शेतकरी, सिंघू बॉर्डरवर दोन हजार तर ढासा बॉर्डरवर 40 ते 50 शेतकरी ठिय्या देऊन आहेत.



























































