केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱयांचा उद्रेक; दिल्ली, पंजाबसह देशभर ठिकठिकाणी निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या तीन जाचक कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱयांच्या संतापाचा सोमवारी उद्रेक झाला. संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या ‘हिंदुस्थान बंद’ला देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला. शेतकऱयांनी दिल्लीच्या दिशेने येणाऱया रस्त्यांवर नाकाबंदी केली. तसेच राज्याराज्यांतील प्रमुख महामार्ग, रेल्वे ट्रकवर उतरून रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प केली. बंदचा राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत मोठा परिणाम दिसून आला. शेतकऱयांनी शिस्तबद्ध आंदोलन केल्यामुळे बंदला कुठेही हिंसक वळण लागले नाही. आंदोलनावेळी दिल्ली-सिंघू सीमेवर शेतकऱयाचा हार्टऍटॅकने मृत्यू झाला.

केंद्राने कृषी कायद्यांसंबंधी शेतकऱयांच्या मागण्यांवर अजूनही ठोस पावले उचलली नाहीत. या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने हा ‘हिंदुस्थान बंद’ पुकारला होता. बंदला काँग्रेस, आरजेडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी तसेच डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला. अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघानेही बंदचे समर्थन केले. अनेक ठिकाणी व्यापारी, वकील आणि विद्यार्थीही बंदमध्ये सहभागी झाले. शेतकऱयांना राजकीय पक्ष व समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे बहुतांश राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. आंदोलनामुळे ठप्प झालेली दिल्ली-गाजीपूर सीमा तब्बल 10 तासांनी सायंकाळी खुली करण्यात आली.

देशभरात बंदचे पडसाद

  • दिल्लीत बंदचा मोठा परिणाम दिसला. शेतकऱयांच्या आंदोलनामुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेसह राजधानीतील बहुतांश महामार्गांवर सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.
  • उत्तर प्रदेशात बहुसंख्य शेतकरी नोएडा ऑथॉरिटीजवळ एकत्र जमले व त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. त्यानंतर त्यांनी नोएडा ऑथॉरिटीकडे मोर्चा वळवला.
  • पंजाबच्या लुधियानात लाडोवाल टोल प्लाझा आणि एमबीडी मॉल फिरोजपूर रोडवर शेतकऱयांनी धरणे आंदोलन केले. राज्यभरात 350हून अधिक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
  • उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांतील मुख्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गांवर शेतकऱयांनी ‘चक्का जाम’ केला. हरियाणात शाळा बंद केल्या. कर्नाटकातही निदर्शने झाली. आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर टायर जाळून केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

बंद 100 टक्के यशस्वी

आम्ही पुकारलेला ‘हिंदुस्थान बंद’ पूर्णपणे यशस्वी झाला. देशभरातील शेतकऱयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आता संयुक्त किसान मोर्चा पुढील रणनीती आखणार आहे. आम्ही सरकारशी चर्चेसाठी तयार आहोत; पण अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी 25हून अधिक राज्यांत बंद यशस्वी झाल्याचा दावा केला.

शेतकऱयांशी चर्चेला सदैव तयार

आमचे सरकार शेतकऱयांसोबत चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहे, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. जे लोक गोंधळ घालत आहेत ते शेतकऱयांचे नुकसान करीत आहेत. विरोधी पक्ष शेतकऱयांच्या खांद्यावरून बंदूक चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

मुंबईतही बंदला पाठिंबा

  • मुंबई फेरीकाले सेनेने भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव येथे केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी अध्यक्ष अशोक देहेरे, संतोष चव्हाण, पांडुरंग शिंदे, परशुराम पत्यानी, चंदन पूर्वे, योगिता सुतार, सुप्रिया घाग आणि शकुंतला कुचेकर आदी उपस्थित होते.
  • शेतकऱयांनी पुकारलेल्या ’हिंदुस्थान बंद’ला मुंबईतही प्रतिसाद मिळाला. अंधेरीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केंद्राच्या कृषी कायद्यांचा निषेध केला