पंजाबमध्ये शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन, रेल्वे रोकोनंतर राष्ट्रीय महामार्ग रोखला

केंद्र सरकाच्या कृषी विधेयकाविरोधात अजूनही आंदोलन सुरू आहे. पंजाबमध्ये हे आंदोलन अजून तीव्र झाले असून शेतकर्‍यांनी रेल्वे रोको केला आणि राष्ट्रीय महामार्गही अडवून ठेवला.

500 हून अधिक संघटना एकत्र

पाच नोव्हेंबर रोजी शेतकरी देशव्यापी रास्ता रोको करणार आहे. यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 500 हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत. मंगळवारी दिल्लीत संघटनांची बैठक पार पाडली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

चलो दिल्ली

26-27 नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. शेती संबंधित तीनही कायदे मागे घेण्यात यावे अशी प्रमुख मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच 2020 चा वीज कायदाही मागे घेण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होणार आहेत.

समिती स्थापन

देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, योगेंद्र यादव, व्ही.एम सिंह, बलबील सिंह, गुरनाम सिंह या शेतकरी नेत्यांचा समावेश आहे.

भाजप नेत्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

संपूर्ण देशात सरकारी कार्यालयांसह भाजप कार्यालयांच्या बाहेर आंदोलन केले जाईल असे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. तसेच भाजप नेत्यांच्या सहकारी कॉर्पोरेट क्षेत्राच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या