
सामना प्रतिनिधी । राहुरी
शेतीतील नापिकीने उत्पन्नात झालेली घट तसेच मुलीच्या लग्नाचे झालेले कर्ज फेडता आले नाही या नैराश्यातून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पटारे -पागिरे वस्तीवरील शेतकरी सुनील कारभारी पटारे (वय 42) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सहा महिन्यांपूर्वी शेतकरी सुनील यांनी थोरल्या मुलीचे लग्न करण्यासाठी उधारी व उसनवारीने पैशांची जुळवाजुळव करून लग्न पार पाडले होते. शेतीच्या उत्पन्नातून सर्व देणी फेडू या अपेक्षेने शेतकरी सुनील पठारे यांनी लेकीच्या लग्नासाठी पैशाची तजवीज करून जेमतेम खर्चात मुलीचे लग्न लावले होते. निर्सगाच्या लहरीपणाने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पठारे यांची बहुतांशी शेती पडीक राहिली. शिल्लक जमीनीत जेमतेम पिक हाती आले मात्र, शेतीमालाचे भाव मातीमोल झाले.पिकाला मिळालेल्या कवडीमोल भावामुळे उत्पन्न घट होऊन लग्नाचे कर्ज फेडणे मुश्किल झाले.या आर्थिक अडचणीने हतबल झालेल्या सुनील कारभारी पटारे यांनी रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून घराशेजारील पत्र्याच्या शेडच्या खांबाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी वांबोरी दूरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आव्हाड करीत आहेत.




























































